पुणे

पुण्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा होत नाही; डॉ.नीलम गोर्‍हे यांचे मत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'पुण्याच्या प्रश्नांचा म्हणावा तितका पाठपुरावा होत नसल्याचे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातून दिसून आले,' असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी रविवारी व्यक्त केले. विधिमंडळाच्या कामकाजाबद्दलची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोर्‍हे शहरातील प्रलंबित प्रश्नांना उत्तर देत होत्या. पुण्याच्या प्रश्नांबाबत विधिमंडळाच्या 18 ते 25 ऑगस्टदरम्यान झालेल्या अधिवेशनात फारसे प्रश्न उपस्थित झालेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

शहराच्या रेंगाळलेल्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नियुक्त झाल्यावर पुण्यातच बैठक घेणार असून, त्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 'पुण्याच्या वाहतूक सुधारणेला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यासाठीचे अनेक प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. त्यांची मांडणी प्रभावीपणे करून पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील खासदार, आमदार, अन्य लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला पाहिजे.

तसेच, शहरात एकमुखी नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे काही प्रश्नांची सोडवणूक होण्यास मर्यादा येत आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'कोणीही उठतो आणि कोणतेही फलक लावतात, पुणेकरांची अडवणूक करतात. अधिकारी परस्पर निर्णय घेतात, हे कशाचे लक्षण आहे? पुणेकरांचा 'माइंड गेम' किती काळ सुरू ठेवणार,' असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 'चांदणी चौकातील वाहतूक कोंडीबाबत पुणेकरांच्या भावना तीव्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणेकरांच्या भावना समजून घेतील,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

'आदित्य ठाकरेंचा पुणे दौरा अजून ठरलेला नाही. जेव्हा तो ठरेल त्या वेळेस पक्षाचे प्रवक्ते बोलतील. त्याआधी तो दौरा तुम्हाला कळवण्यात येईल. आमचा दौरा हा जाहीर असेल. घर ते कार्यालय किंवा कार्यालय ते घर नसेल,' असा टोला डॉ. गोर्‍हे यांनी तानाजी सावंत यांच्या दौर्‍यावरून लगावला आहे.

SCROLL FOR NEXT