पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'पुणेरी मेट्रो' या नावाने प्रसिद्ध असलेल्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या सेगमेंटची उभारणी शुक्रवारी हिंजवडी येथे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते पार पडली. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, संचालक नेहा पंडित, 'पीएमआरडीए'चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, 'पीएमआरडीए'च्या अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, 'पीएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविस्कर यांच्यासह पीआयटीसीएमआरएल, पीएमआरडीए आणि टाटा समूहाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सुमारे 46 टन वजनाचा हा सेगमेंट मेट्रो लाईन 3 च्या नियोजित स्टेशन क्र. 1 आणि 2 मध्ये उभारण्यात आला असून, त्यामुळे 23 किमी अंतराच्या पूर्णपणे उन्नत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन 3 च्या वेगाने सुरू असलेल्या कामाला आणखी चालना मिळाली आहे.
पायलिंगचे काम जोरात
मेट्रो उभारणीसाठी आवश्यक सेगमेंटचे कास्टिंग ताथवडे येथील कास्टिंग यार्डमध्ये केले जात आहे. या एका सेगमेंटची लांबी सुमारे 3.6 मीटर असून, वजन सुमारे 46 टन आहे. मेट्रोच्या दर दोन खांबांच्या मध्ये असे साधारण 10 ते 12 सेगमेंट्स उपयोगात आणले जातात. पायलिंगचे कामही जोराने सुरू आहे. कास्टिंग यार्डमध्ये आवश्यक तितक्या सेगमेंट्स तयार करून ठेवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.
पीएमआरडीएप्रणित पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचे काम एका शाश्वत वेगाने प्रगतिपथावर आहे. आज या मार्गावरील पहिल्या सेगमेंटची उभारणी केल्याने एक महत्त्वाचा टप्पा साध्य झाला असून, प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू राहील, असा आम्हाला विश्वास वाटतो.
– डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए