नसरापूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ठेकेदारावर कोणताच अंकुश नसल्याने पुणे – सातारा महामार्गाचे रुंदीकरणाचे कासव गतीने सुरु आहे. त्यामुळे हरिश्चंद्री फाट्यावर अपघाताची मालिका सुरू आहे. गेल्या सोमवारी हरिश्चंद्री येथील महामार्गावर कार उलटली होती. सोमवारी (दि. 18) पुन्हा कार उलटली. आठवड्यात कार उलटण्याची दुसरी घटना घडली. या अपघातात देखील तिघेजण बचावले.
सातारा बाजूकडे जाणारी कार(एमएच 05 सीएच 4230) हरिश्चंद्री (ता. भोर) फाट्यावर महामार्ग व सेवा रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकात उलटली. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, गेल्या सोमवारी (दि. 11) याच ठिकाणी लोणंदकडे जात असताना कार महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या नाल्यामध्ये उलटली होती. या अपघातात बाप लेक बचावले होते.
पुणे – सातारा महामार्गावरील हॉटेल रेणुका ते हरिश्चंद्री फाट्यापर्यंत अपघात प्रवणक्षेत्र निर्माण झाले आहे. तीव्र उताराचा वळणदार महामार्गाचा अंदाज येत नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटून असे अपघात वारंवार घडत आहे. अपघात प्रवणक्षेत्र ठिकाणी रिफ्लेक्टर, पांढरे पट्टे, दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालवताना अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत.