पुणे

पुणे : स्वातंत्र्यदिनी विधवांना ध्वजारोहणाचा मान

अमृता चौगुले

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिसर्वे गावाने सोमवारी विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करून विधवा प्रथा मोडीत काढण्याचा तसेच विधवांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा निर्णय घेतल्याचे सरपंच बाळासाहेब कोलते यांनी सांगितले.

पिसर्वे (ता. पुरंदर) येथे सोमवारी विशेष ग्रामसभा झाली. ग्रामसभेत परंपरेने चालत आलेली विधवा प्रथा मोडण्याचा निर्णय घेतला. उपसरपंच मीना कोलते, माजी उपसरपंच अरुणा कोलते, सदस्य रवींद्र कोलते, महेश वाघमारे, चंद्रकांत कोलते, सुनील कोलते आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'आम्ही संवादी' या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी गावकर्‍यांसह महिलांना ही प्रथा बंद करण्यामागची कारणे व गरज, याबाबत प्रबोधन केले. पिसर्वे ग्रामपंचायतीच्या इतिहासात या ग्रामसभेला पहिल्यांदाच महिला व गावकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला. सरपंच बाळासाहेब कोलते यांनी मांडलेला ठराव व सदस्या योगिता कोलते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकर्‍यांनी हात उंचावत संमती दिली.

ग्रामपंचायतीने सुवर्णाक्षरांनी लिहावा असा निर्णय घेतला. विधवा प्रथा आम्ही मोडीत काढली. गावातील महिला पतीच्या निधनानंतर कपाळीचे कुंकू पुसणार नाहीत, गळ्यातील मंगळसूत्र तोडणार नाहीत, पायातील जोडवी उतरवली जाणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ.

                                                                – योगिता कोलते, ग्रामपंचायत सदस्या

आमच्या गावाने आज विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. आज सर्व गावासमोर आम्हाला हळदी-कुंकू, बांगड्या, साडी-चोळी देऊन सन्मान केला. पतीच्या मागे आपले कोण, अशी चिंता होती. तिथे आमच्यासाठीही कोणीतरी असल्याचे समाधान वाटले.

                                                                                   – रोहिणी सूर्यवंशी, विधवा

SCROLL FOR NEXT