हिरा सरवदे
पुणे : वाहतूक नियंत्रित करण्यासाठी शहरातील विविध चौकांत बसविण्यात येणारी 'एटीएमएस' (अॅडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) यंत्रणा स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वादात अडकली आहे. खोदाईसाठी महापालिका परवानगी देत नाही, असा आरोप स्मार्ट सिटीकडून केला जात आहे; तर स्मार्ट सिटीकडून योग्य माहिती दिली जात नसल्याचा आरोप पालिकेने केला आहे. दुसरीकडे महापालिका अधिकार्यांमध्येही एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. शहरात खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे.
ही कोंडी फोडण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संयुक्तपणे उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रमुख 125 चौकांमध्ये पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक 'एटीएमएस' सिग्नल बसविले जाणार आहेत. हे सिग्नल पूर्णत: स्वयंचलित असणार असून, सिग्नलला थांबलेल्या वाहनांच्या संख्येची मोजणी करून ते स्वत:ची वेळ स्वत: निश्चित करणार आहेत. सिग्नलवरून पुढे गेलेल्या वाहनांची माहिती संगणक यंत्रणेद्वारे देवाण-घेवाण करून एकमेकांच्या वेळा सिंक्रोनाईज करणार आहेत.
ज्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिक असेल, त्या रस्त्यावर सिग्नलचा वेळ जास्त असेल, तर ज्या रस्त्यावरील वाहने सिग्नलच्या पुढे जातील आणि एकही वाहन नसेल तेव्हा सिग्नल इतर बाजूची वाहतूक आपोआप सुरू करेल. याशिवाय, ही स्वयंचलित यंत्रणा असल्याने सिग्नलमध्ये काही बिघाड झाल्यास अथवा वाहतूक कोंडी झाल्यास त्याची माहिती मेसेजद्वारे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सिस्टिम, महापालिका, तसेच वाहतूक पोलिसांच्या यंत्रणेला मिळेल. या सिग्नलमध्ये कॅमेरे असतील, तसेच ते रस्त्यावरील वाहनांची मोजणी करून त्यानुसार आपल्या वेळा स्वत: बदलणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही यंत्रणा शहरातील 30 चौकांमध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन स्मार्ट सिटीने केले आहे. मात्र, स्मार्ट सिटी आणि महापालिका यांच्यात वाद निर्माण झाल्याने ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही.
स्मार्ट सिटीचे अधिकारी म्हणतात…
शहर व उपनगरांतील 125 चौकांमधील सिग्नल 'एटीएमएस' यंत्रणेच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 30 चौकांमध्ये ही यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे. यासाठी पायाभूत तयारी आणि साधनसामग्रीची खरेदी केलेली आहे. उर्वरित कामे करण्यासाठी आणि यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेकडून परवानगी दिली जात नाही. त्यामुळे गेले चार महिने काम थांबलेले आहे, असा आरोप स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी केला आहे.
पथ विभागाचे अधिकारी म्हणतात…
या यंत्रणेसाठी चौकांजवळील पदपथावर नियंत्रण बॉक्स बसविले जाणार आहेत. सिग्नलचे पोल उभे केले जाणार आहेत, तसेच वीजजोडणीसाठी रस्ते खोदले जाणार आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पदपथ आणि रस्ते खोदाई केल्यास नागरिकांची गौरसोय होऊ शकते. त्यातच कोणत्या ठिकाणी काम केले जाणार आहे, पदपथाची किती जागा व्यापणार आहे, हे जागेवर जाऊन माहिती देण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र, स्मार्ट सिटीकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकार्यांनी केला आहे.
पालिका अधिकार्यांमध्ये एकवाक्यताच नाही!
स्मार्ट सिटीचे अधिकारी काम करण्याची ठिकाणे दाखवत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत, असा आरोप पथ विभागाकडून केला जात असताना महापालिकेच्याच विद्युत विभागाचे अधिकारी 'एटीएमएस' यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे, मार्किंग झाली आहे, तसेच पादचारी सिग्नलचीही ठिकाणे निश्चित झाल्याचे सांगत आहेत. यावरून महापालिकेच्याच अधिकार्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे समोर
आले आहे.
पहिल्या टप्प्यात या चौकांमध्ये यंत्रणा
कर्वे पुतळा चौक
मृत्युंजय चौक
करिष्मा चौक
पौड फाटा चौक
नळस्टॉप चौक
स्वातंत्र्य चौक
रसशाळा चौक
शेलारमामा चौक
खंडोजीबाबा चौक
अलका टॉकीज चौक
टिळक चौक
साहित्य परिषद चौक
बादशहा चौक
एस. पी. चौक
विनोबा भावे चौक
पूरम चौक
हिराबाग चौक
जेधे चौक
वेगा सेंटर चौक
सेव्हन लव्हज चौक
धोबी घाट चौक
गोळीबार मैदान चौक
पूलगेट चौक
सेंट मेरी चौक
एएफएमसी चौक
रेसकोर्स चौक
भैरोबा नाला चौक
फातिमानगर चौक
बी. टी. कवडे चौक
आठवडाभरात संयुक्त बैठक
'एटीएमएस' यंत्रणेसाठी प्रत्येक चौकात चार पोल उभे करणे, वीजजोडणीसाठी रस्ते खोदणे, पदपथांवर नियंत्रण बॉक्स बसविणे, अशी कामे केली जाणार आहेत. एका चौकातील काम किती दिवसांत पूर्ण होईल, पदपथावर बॉक्स बसविल्यानंतर पादचार्यांसाठी किती पदपथ शिल्लक राहणार आहे, याची माहिती मागितल्यानंतर स्मार्ट सिटीचे अधिकारी पुन्हा आलेच नाहीत. स्मार्ट सिटीचे अधिकारी व काम करणार्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी वेगवेगळी माहिती देतात. आठवडाभरात संयुक्त बैठक घेऊन तिढा सोडविला जाईल.– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका