पुणे

पुणे : स्टेट बँकेच्या इमारतीत आग

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कर्वे रस्त्यावरील नळस्टॉपजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असलेल्या एका इमारतीतील बेसमेंटमध्ये किरकोळ आग लागल्याची घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. विद्युत बिघाडामुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली.

यानंतर तत्काळ एरंडवणा व कोथरूड विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. बेसमेंटमध्ये चार फॅन होते. यातील एक फॅन जळून खाक झाल्याने हा धूर झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. धुराचे प्रमाण जास्त असल्याने बँकेतील कर्मचार्‍यांनी बाहेर धाव घेतली. अग्निशमन जवानांनी बचावकार्य राबवित 15 ते 20 मिनिटांत यावर नियंत्रण मिळविले. घटनेत कुठलीही हानी झाली नाही.

SCROLL FOR NEXT