पुणे

पुणे : सिंहगड घाटरस्त्यावरील दरडी अखेर काढल्या

अमृता चौगुले

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसात चार दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्याच्या घाटरस्त्यावर दरडी कोसळल्या होत्या. अखेर त्या दरडी रविवारी (दि. 17) सायंकाळी वन विभागाने जेसीबी मशिनच्या साह्याने काढून रस्ता मोकळा केला.

दरडी कोसळल्यानंतर गुरुवारपासून अतिवृष्टीमुळे सुरक्षेसाठी प्रशासनाने घाट रस्ता बंद केला होता. मात्र, आता तो सोमवार (दि.18) पासून गड सुरू होणार आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी सिंहगड किल्ला परिसरात अधूनमधून सरी कोसळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दरडी काढून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे पुणे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले.

गुरुवारी (दि.14) घाटरस्त्यावर जगताप माचीजवळ मोठी दरड कोसळली होती. गड बंद असल्याने सुदैवाने दुर्घटना घडली नाही. मात्र, चार दिवसांपासून पडलेल्या दरडीचा राडा-रोडा, दगड रस्त्यावर तसेच पडले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. स्थानिकांनी प्रशासनाचे याकडे लक्ष वेधल्यानंतर दरड हटविण्यात आली.

प्रशासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून पर्यटनास गड खुला होणार आहे. पावसामुळे घाटरस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे तेथे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

                              – बाळासाहेब लटके, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड वन विभाग

SCROLL FOR NEXT