पुणे

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पीएमपी अपयशी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'शहराची लोकसंख्या लक्षात घेता रस्त्यावर 4 हजारांहून अधिक बस आवश्यक असताना पीएमपीच्या फक्त 1 हजार 600 बस धावतात. त्यामुळे पीएमपीला पुणेकर नागरिकांना सक्षम वाहतूक व्यवस्था पुरवण्यात अपयश येत आहे,' असे मत वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी व्यक्त केले. सजग नागरिक मंचाच्या वतीने 'पुण्यातील सार्वजनिक वाहतूक पीएमपीएमएल व प्रवासी हित' या विषयावर रविवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, पीएमपी प्रवासी मंचचे मानद सचिव संजय शितोळे उपस्थित होते.

देशपांडे म्हणाल्या, की शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे आवश्यक आहे. पीएमपीचा मूळ हेतू हा नफा-तोटा न बघता सार्वजनिक सुविधा पुरवणे हा असला पाहिजे. पण, पीएमपी आपला मूळ हेतूच विसरत चालली आहे. तसेच, सध्याचा हेतू हा प्रवासी केंद्रित नसल्याने प्रवाशांची संख्या ही मागच्या काही वर्षांपासून तेवढीच आहे. ई-कॅब सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटणार नसून, यात आणखी भरच पडणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने इ-कॅब सुरू करण्याऐवजी बसची संख्या वाढविल्यास प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल.

या वेळी शितोळे म्हणाले, की पीएमपीकडे प्रवासी मोजायची यंत्रणाच उपलब्ध नाही. पीएमपी रोज प्रवाशांचा आकडा जाहीर करीत आहे. त्यात बर्‍याच त्रुटी आहेत. शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. एक लाख लोकसंख्येमागे 50 बस आवश्यक असताना सध्या याची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना सक्षम, सुरक्षित आणि स्वस्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही, हे पुणेकरांचे दुर्दैव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT