पुणे, पुढारी वृत्तसेवा : 'पुणे ग्रामीण विभागात सुकन्या समृद्धी खात्यांसाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विशेष अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत या आर्थिक वर्षात सात गावांना 'संपूर्ण सुकन्या ग्राम' घोषित करण्यात आले आहे,' अशी माहिती पुणे ग्रामीण डाकघरचे अधीअक बी. पी. एरंडे यांनी दिली.
सुकन्या समृद्धी योजना हा 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमाचा भाग असून, दहा वर्षांच्या आतील मुलींचे खाते किमान 250 भरून पोस्टात उघडता येते. या योजनेला सर्वाधिक व्याजदर असून, मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसे काढता येतात. सुकन्या समृद्धी खात्यासाठी अनेक गावांनी पुढाकार घेतला असून, सन 2022-23 या आर्थिक वर्षात सात गावे संपूर्ण सुकन्या ग्राम म्हणून जाहीर झाली आहेत. त्यात पश्चिम उपविभागातील कुसगाव, कान्हे व टाकवे खुर्द, दक्षिण उपविभागातील बारे, आळंदे, वेनवडी व भोंगवली आदी गावांचा समावेश आहे.
यासाठी ग्रामपंचायत कुसगावच्या सरपंच अश्विनी गुंड, कान्हेचे सरपंच विजय सातकर, ग्रामपंचायत बारे गावच्या सरपंच जयश्री वेदपाठक, आळंदेचे सरपंच उदयसिंह राजेशिर्के, वेनवडीचे सरपंंच रूपेश नेवसे, भोंगवलीचे सरपंच अरुण पवार व टाकवे खुर्दचे सरपंच तुशांत ढमाले यांनी पुढाकार घेतला.
उपविभागीय अधिकारी गणेश वडुरकर यांनी शाखा डाकपालांना मार्गदर्शन करून सुकन्या ग्राम करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रचिता गोरे (पोस्टमास्तर, कुसगाव), संतोष काकडे (पोस्टमास्तर, कान्हे), नागेश विभुते (पोस्टमास्तर, बारे), नामदेव सणस (पोस्टमास्तर, आळंदे), श्रीमती अश्विनी शिंदे (पोस्टमास्तर, वेनवडी), विकास शेडगे (पोस्टमास्तर, भोंगवली) यांनी या गावांमध्ये सुकन्या खात्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्याचबरोबर दक्षिण उपविभागाचे डाक आवेक्षक विलास जेधे व प्रफुल्ल सुतार, पश्चिम उपविभागाचे डाक आवेक्षक संजय मराठे व समीर चौधरी यांनी मेळावे घेऊन सुकन्या खात्यांसाठी विशेष प्रयत्न केले.
पुणे ग्रामीण विभागात मागील आर्थिक वर्षापर्यंत एकूण 30 गावे 'संपूर्ण सुकन्या ग्राम' झालेली आहेत. या वर्षात एकूण 50 गावे संपूर्ण सुकन्या ग्राम करण्याचा मानस आहे. जास्तीत जास्त गावांनी यामध्ये सहभागी होऊन गावामधील सर्व पात्र मुलींचे सुकन्या समृद्धी खाते उघडावे व गाव 'संपूर्ण सुकन्या ग्राम' करावे, असे आवाहन एरंडे यांनी केले आहे.