पुणे

पुणे : साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांची ससूनला रवानगी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या तीन वर्षांत पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातून साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांना ससून रुग्णालयात 'रेफर' करण्यात आले. पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कमला नेहरू रुग्णालयातून रुग्णांना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. महापालिकेच्या रुग्णालयांना कोरोना काळात व्हेंटिलेटरसह अनेक आयसीयू युनिट्स प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता तरी उपचारांना चालना मिळेल, अशी अपेेक्षा व्यक्त केली जात आहे. ससून रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण तसेच जिल्ह्याच्या आसपासच्या भागातील रुग्णांची आधीच गर्दी असते. त्यामुळे शहरातील रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 966 रुग्णांना 'रेफर' केले गेले. 2020 मध्ये, कोरोनाच्या पहिल्या वर्षात एकूण 1907 रुग्णांना ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते, तर 2021 मध्ये सुमारे 789 रुग्णांना 'रेफर' करण्यात आले होते.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एकूण 41 दवाखाने, 18 प्रसूती गृहे, एक संसर्ग नियंत्रण रुग्णालय आणि एक सामान्य रुग्णालय आहे. मात्र, डॉक्टरांची रिक्त पदे व सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना ससूनमध्ये धाव घ्यावी लागते किंवा खासगी रुग्णालयात मोठी किंमत मोजावी लागते, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

ससूनकडे पाठवण्यात आलेले रुग्ण
वर्ष रुग्णसंख्या
2019 966
2020 1907
2021 789

'आयसीयू' नसल्याने…
कमला नेहरू रुग्णालयामध्ये 'आयसीयू' नसल्यामुळे ससूनकडे बहुतेक 'रेफरल्स' शस्त्रक्रियांसाठी असतात. यामध्ये हृदयाशी संबंधित ऑपरेशन्स, थायरॉईड शस्त्रक्रिया किंवा न्यूरोलॉजिकल हानी झालेल्या मोठ्या अपघातांचा समावेश असू शकतो. कमला नेहरू रुग्णालयामध्ये आयसीयूचे काम सुरू असून, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ आउटसोर्स केले जाईल. नुकतेच कमला नेहरू रुग्णालयात 5 व्हेंटिलेटरसह 20 बेडचे एनआयसीयू देखील सुरू करण्यात आले आहे.

महापालिकेकडून सध्याची रुग्णालये अधिकाधिक सक्षम करण्याऐवजी आणि आवश्यक कर्मचारी भरती आणि काम पूर्ण करण्याऐवजी हळूहळू सर्व रुग्णालयांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यातून धडा घेऊन महापालिकेने आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर भर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

                                                                      – डॉ. अभिजित मोरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT