पुणे

पुणे : सहा महिन्यांपूर्वीचा अत्याचार उघड; अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण केल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याचदरम्यान ती घरी आल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देताना तिच्यावर सहा महिन्यांपूर्वी एकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महेश ईश्वर मोरे (वय 25, रा. राकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत 15 वर्षीय पीडित मुलीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाखल गुन्ह्यानुसार, पीडित मुलगी ही तिच्या आई-वडील आणि छोट्या बहिणीसह पुण्यातील एका झोपडपट्टी परिसरात राहण्यास आहे. सध्या ती दहावीत आहे.

कुटुंबाचे हातावर पोट असून, मुलीचे आई-वडील दोघेही काम करून घरातील उदरनिर्वाह चालवतात. परंतु, त्या पती-पत्नीमध्ये सारखेच वाद होत असल्याने 28 जुलै रोजी पीडित मुलगी वैतागून घराबाहेर येऊन रुसून बसली. त्याचवेळी त्यांच्या परिसरात राहणारा तिचा मित्र सुरेश तेथे आला. त्याने तिला समजावून सांगण्याच्या बहाण्याने तिचे अपहरण करून तो तिला मुंबई येथे घेऊन गेला.

मुलगी घरी न आल्याने तिच्या वडिलांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याचदरम्यान गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर मुलगी घरी आली. गुन्हा दाखल झाल्याने मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी तिला विचारणा केली असता तिने सुरेशने नाही; पण सहा महिन्यांपूर्वी महेश मोरेने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले.

अचानक घरात घुसून बलात्कार
19 फेब्रुवारी रोजी शाळेत शिवजयंतीचा कार्यक्रम असल्याने सकाळी सात वाजता शाळेतून ती कार्यक्रम उरकून 9 वाजण्याच्या सुमारास घरी आली. या वेळी ती कपडे बदलत असताना महेश अचानक घरात शिरला. त्याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी त्याने दिली. याचदरम्यान तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर यापूर्वी घडलेला हा सर्व प्रकार उघडकीस आला. पुढील तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT