पुणे

पुणे : ससून रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ससून सर्वोपचार रुग्णालयात बुधवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. पिंपरी-चिंचवडमधील ब्रेनडेड  तरुणाची एक किडनी ग्रीन कॉरिडॉरद्वारे आणून ससून रुग्णालयात तरुणीवर प्रत्यारोपित करण्यात आली.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख व ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सुरेश पाटणकर व पथकाने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, महिलेची प्रकृती व्यवस्थित आहे, अशी माहिती किडनी प्रत्यारोपण करणारे डॉ. सुरेश पाटणकर यांनी दिली.

अवयवदात्या तरुणाची दुसरी किडनी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील 38 वर्षीय तरुणावर प्रत्यारोपित करण्यात आली. त्याचे यकृत 60 वर्षीय महिलेमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. चिखलीतील 28 वर्षीय रिक्षाचालकाच्या मेंदूला मार लागल्याने पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ब्रेनडेड झाल्याने त्याच्या नातेवाइकांनी अवयवदानास परवानगी दिली. त्याच्या दोन किडनी, फुप्फुस, हृदय, यकृत असे पाच अवयवांचे दान करण्यात आले.

ब्रेनडेड रुग्णामुळे पाच जणांना जीवनदान
ब्रेनडेड तरुणाचे हृदय सूरतच्या बीडी मेदांता महावीर हार्ट इन्स्टिट्यूट येथील तरुणासाठी पाठविण्यात आले. फुप्फुस हैदराबाद येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलला 60 वर्षीय रुग्णासाठी पाठविण्यात आले. हे अवयव रिजनल ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर्गनायजेशन (रोटटो) व स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (सोटटो) द्वारे पाठवण्यात आले.

SCROLL FOR NEXT