बावडा, पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे या नीरा नदीकाठच्या परिसरात शनिवारी (दि. 30) अतिवृष्टी झाली. सराटी येथे तब्बल 90 मिमी. पाऊस पडला. अतिवृष्टीने मका, कडवळ, आडसाली ऊस या पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे.
मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह सुमारे 3 तास चालू होता. त्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी शेतातील बांध हे मातीसह वाहून गेले आहेत. तसेच, कडवळ, मका ही पिके बहुतांशी ठिकाणी भुईसपाट झाल्याची माहिती कृषी पदवीधर शेतकरी अमर भोसले (सराटी) व भारत पालवे (ओझरे) यांनी दिली. मात्र, हा पाऊस जमिनीमधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्यासाठी व खरीप पिकांच्या, उसाच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचेही सांगितले.