इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाका प्रशासनाकडून इंदापूर शहर आणि स्थानिक वाहनांकडून आकारली जाणारी रक्कम ही तत्काळ बंद करावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 5) जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांसह वाहनचालक व मालकांनी टोलनाक्यावर आंदोलन केले.
इंदापूर शहरातून व्यवसाय करणारी सुमारे 150 जीप, कार इत्यादी वाहने ही जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेशी निगडीत आहेत. यापैकी बरेच जण सरडेवाडी, हिंगणगाव, बाभूळगाव, भीमानगर आदी गावांतील रहिवासी आहेत किंवा या परिसरात त्यांच्या शेतजमिनी आहेत. अनेक जणांच्या जमिनी या महामार्गासाठी संपादित झालेल्या आहेत. या वाहनांना अनेकदा टोल प्लाझा ओलांडून ये-जा करावी लागते. त्यामुळे आजपर्यंत या लोकल वाहनांना टोल आकारला जात नव्हता, परंतु सुमारे 1 जून 2022 पासून या गाड्यांच्या केवळ नंबरवरून (फास्ट टॅग नसला तरी) या वाहनांकडून टोल वसूल केला जात आहे, असा आरोप या संघटनेने केला आहे.
या आंदोलनादरम्यान बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांनी आंदोलनस्थळी येऊन सरडेवाडी टोल प्रशासनाला अशा पद्धतीने टोल वसुलीचा जाब विचारला. त्यावर शुक्रवार (दि. 8) पर्यंत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून आपल्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केल्या जातील व आपणास कळवले जाईल, असे आश्वासन सरडेवाडी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
या वेळी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचे इंदापूर तालुका अध्यक्ष विनोद मखरे, रिपब्लिकन नेते संजय सोनवणे यांसह स्थानिक वाहनचालक- मालक उपस्थित होते. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी इंदापूरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, जगदीश चौधर यांसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.