पुणे

पुणे : संशोधनासाठी विद्यार्थ्यांची जर्मनीला पसंती!

अमृता चौगुले

गणेश खळदकर
पुणे : उच्च दर्जाचे संशोधन करण्याची संधी, राहण्यासाठी परवडणारी घरे, शिक्षणासाठीचे माफक शुल्क, जर्मन सरकारची शिष्यवत्ती, नोकरीच्या सर्वाधिक संधी यामुळे अमेरिका, इंग्लंड आणि इतर युरोपियन देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण तसेच संशोधनासाठी जर्मनीला सर्वाधिक पसंती आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीमध्ये साडेतीन लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. जर्मनीमध्ये राहण्याची किंमत परवडणारी आहे. जर्मन विद्यापीठे हजारांहून अधिक अभ्यासक्रम आता इंग्रजीमध्ये शिकवित आहेत. त्यामुळेे उच्च शिक्षण तसेच संशोधनाच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत. जर्मनीला जाताना शेंगेन नियमन परवाना मिळतो, त्यासाठीच्या अटी आणि पात्रता तुलनेत शिथिल आहेत.

दरवर्षी जर्मनीला जाणार्‍यांचे प्रमाण वाढते…
2019 -20 या शैक्षणिक वर्षात 25 हजार 149 भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मनीतील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला होता, तर 2018-19 या शैक्षणिक वर्षात 20 हजार 810 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्याचबरोबर अभियांत्रिकी, मॅनेजमेंट अँड सोशल स्टडीज, मॅथेमॅटिक्स अँड नॅचरल सायन्स या शाखांमध्ये प्रवेश दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

प्रवेशासाठी हवी असलेली प्रमाणपत्रे…
जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या उच्च शिक्षण संस्था, संशोधन विद्यापीठे, तांत्रिक विद्यापीठे आणि उपयोजित विज्ञान विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी गुणपत्रिकांचा उतारा (ट्रान्सक्रिप्ट), विद्यार्थ्यांचा बायोडाटा आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाचा पुरावा म्हणजेच आय.ई.एल.टी.एस. किंवा टोफेल परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, तर काही विद्यापीठांसाठी एक वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

अमेरिका, इंग्लंड यांच्या तुलनेने उच्च शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती युरोपियन देशांना अधिक आहे. विशेषतः विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यासाठी विद्यार्थ्यांची जर्मनीला प्रथम पसंती आहे. विद्यार्थ्यांचा सिंगापूर आणि जपान या देशांमध्ये जाण्याचाही कल दिसतो. जर्मनीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रमाण अधिक आहे, तसेच नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत.

                                                     – प्रा. डॉ. गणेश मा. काकांडीकर,
                                  प्राध्यापक तथा संकुलप्रमुख, यंत्र अभियांत्रिकी, एमआयटी

SCROLL FOR NEXT