पुणे

पुणे : संपामुळे पोस्टाची अत्यावश्यक सेवा ठप्प

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरासह विभागात विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचार्‍यांच्या संयुक्त संघटनांतर्फे बुधवारी (दि.10) एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. यामुळे पोस्टाची सर्व अत्यावश्यक सेवा ठप्प झाली होती . संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनांतर्फे करण्यात आला. डाक मित्र योजना व कॉमन सर्व्हिसच्या माध्यमातून टपाल खात्याचे खासगीकरण करण्याचे धोरण थांबवा तसेच डाक बचत बँकेचे पोस्ट पेमेंट या खासगी बँकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करा, नवीन पेन्शन योजना रद्द करा आणि सर्व कर्मचार्‍यांना जुनी पारंपरिक पेन्शन योजना लागू करा, ट्रेड युनियनवरील हल्ले थांबवा या आणि इतर मागण्यांसाठी टपाल कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला होता.

या संपामुळे पुणे शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील 120 आणि ग्रामीण भागातील 90 टपाल कार्यालये पूर्णपणे बंद होती. संपात पुणे शहरातील सर्व टपाल कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती कृती समितीचे राजू तुपे, गणेश खेडकर, शंकर म्हस्के, अनिल शिवतारे, राहुल जाधव यांनी दिली. या संपात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, ग्रुप सी, पोस्टमन व एमटीएस व जीडीएस नॅशनल युनियन या संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT