पुणे

पुणे : संघर्ष टाळून काम केल्यास आनंद मिळतो; राम नाईक यांचे मत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'राज्यपाल म्हणून काम करताना अनेक निर्णयांवरून संघर्ष निर्माण होतो. परंतु, संघर्ष टाळून काम केल्यास आनंद मिळतो,' असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले. या वेळी नाईक यांनी उत्तर प्रदेशमध्ये काम करताना आलेले अनुभव विशद करीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार आल्यापासून उत्तर प्रदेशमध्ये विकास होत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यपाल हे केंद्र आणि राज्य सरकार यांचा दुवा असतो.

राज्याची स्थिती काय आहे, यासंबंधी दर महिन्याला राज्यपाल राष्ट्रपतींना अहवाल पाठवितात. त्याच्या प्रती पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना पाठविल्या जातात, असेही त्यांनी सांगितले. 'अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम करताना राजकीय दबाव आला का?' असा प्रश्न विचारला असता, 'मी घटनेतील नियमानुसार काम करीत होतो. त्यामुळे दबाव येण्याचा प्रश्नच नव्हता,' असे नाईक म्हणाले.

'योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक निर्णय सहजरीत्या घेता आले. त्यात अलाहाबादचे 'प्रयागराज' आणि फैजाबादचे 'अयोध्या' असे नामकरण करणे शक्य झाले. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना त्यांना अनेक निर्णय राजकीयदृष्ट्या शक्य नसल्याने घेता आले नाहीत. मात्र, योगी आल्यानंतर ती अडचण निर्माण झाली नाही,' असेही नाईक म्हणाले.

राज्यपालांवर मी बोलणार नाही
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या 12 सदस्यांबाबत निर्णय न घेणे, विधानसभाध्यक्ष निवड आणि एकंदरीत कार्यप्रणालीविषयी विचारले असता, राम नाईक म्हणाले, 'राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यावर मी काही बोलणे योग्य नाही.'

SCROLL FOR NEXT