पुणे : भारतीय शेअर बाजाराने बुधवारी जोरदार उसळी घेतली. मुंबई शेअर निर्देशांकाने तर 417.92 अंकांची वाढ नोंदवून 60 हजार अंकांची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडली. निफ्टीही या सत्रात 18 हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला. पपरदेशी वित्त संस्थांनी खरेदीला दिलेल्या जोरदार पाठिंब्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण राहिले. प्रामुख्याने बजाज फाईनसर्व्ह, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, इन्फोसिस यांच्यात चांगली भाववाढ झाली.
मुंबई शेअर निर्देशांक 59 हजार 938.05 अंक पातळीवर खुला झाला. त्याने या सत्रात 60 हजार 323.25 अंकांची उच्चांकी पातळी नोंदवली, तर 59 हजार 857.80 अंकांची नीचांकीही गाठली. मात्र, मंगळवारच्या सत्राच्या तुलनेत त्यात 417.92 अंकांची वाढ होऊन तो अखेरीस 60 हजार 260.13 अंक पातळीवर बंद झाला. तसेच निफ्टी 17 हजार 868.15 अंक पातळीवर खुला झाला. त्याने 17 हजार 965.95 अंकांची उच्चांकी, तर 17 हजार 833.35 अंकांची नीचांकी नोंदवली. मंगळवारच्या सत्राच्या तुलनेत अखेरीस त्यात 119 अंकांची वाढ होऊन 17 हजार 944.25 अंक पातळीवर बंद झाला.