पुणे

पुणे : शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद; उद्या वाहतुकीत बदल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गणपती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि 31) मध्य भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येते. शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. कसबा पेठेतील डेंगळे पूल ते शिवाजी पूल, कसबा पेठ, जिजामाता चौक, सारसबाग परिसरातील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

…असे व्हा मार्गस्थ
शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भय्या चौक (मंडई) परिसरात वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. संचेती चौकाकडून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणार्‍या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

हे रस्ते असतील वाहतुकीसाठी खुले
फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
मंगला चित्रपटगृह, प्रीमिअर गॅरेज गल्ली ते खुडे चौक (डेंगळे पूल)

अशी असेल पार्किंगची व्यवस्था
कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा चौक दरम्यान एका बाजूला वाहने लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंडईतील सतीश मिसाळ वाहनतळ, हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ येथे वाहने लावता येतील. शाहू चौक (फडगेट चौकी) ते राष्ट्रभूषण चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

स्वारगेटकडे जाणार्‍या मार्गात बदल
शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणार्‍या पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे बस जातील. महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणार्‍या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT