पुणे; पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री व शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह सहा पदाधिकार्यांची न्यायालयाने शनिवारी येरवडा कारागृहात रवानगी केली. या पदाधिकार्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात
आली होती. मात्र, तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही, असे नमूद करत न्यायालयाने हा आदेश दिला. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राजेश पळसकर, संभाजी थोरवे, सूरज लोखंडे आणि चंदन साळुंके अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सामंत यांच्या वाहनचालकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची मंगळवारी (दि. 2) रात्री कात्रज चौकात सभा झाल्यानंतर तेथून जाणार्या सामंत यांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली होती. या प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेच्या सहा पदाधिकार्यांना अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर या पदाधिकार्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.
पोलिसांना तपास करण्यासाठी योग्य ती मुदत देण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींपैकी कोणीही त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला, तो ग्राह्य धरत न्यायालयाने सहा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या प्रकरणात शिवसेनेच्या सहा पदाधिकार्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.