पुणे : हिरा सरवदे : महापालिकेने हाती घेतलेल्या शिवणे-खराडी नदीपात्रालगतच्या रस्ताचा पुरता बाजार उठला आहे. हा संपूर्ण प्रकल्प 363.4 कोटीचा असताना तुकड्या तुकड्याच्या कामासाठी आजवर तब्बल 280 कोटी खर्च करण्यात आले आहेत. कामाची सध्याची स्थिती पाहता शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत वाहतुककोंडीचा सामना न करता पोहचणे हे वाहनचालकांचे स्वप्न आधुरेच राहणार, म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि नागरिकांना शहराच्या पूर्व आणि पश्चिम टोकाला वाहतुककोंडीचा सामना न करता पोहचता यावे, यासाठी महापालिकेने 2011 साली शिवणे-खराडी या नदीपात्रालगतच्या 17.11 किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे नियोजन केले. हे काम शिवणे ते म्हत्रे पूल, म्हात्रे पूल ते संगमवाडी आणि संगमवाडी ते खराडी असे तीन टप्प्यात करण्यासाठी 363.4 कोटी निवीदा काढण्यात आली. काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी निश्चित केला होता. मात्र, या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही.
महापालिका प्रशासनाने नियोजित प्रकल्पातील 85 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. उर्वरील काम भूसंपादनाअभावी होऊ शकले नसल्याचे, सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याची पाहणी केल्यानंतर "करायचा होता गणपती आणि झाला हनुमान", असेच म्हणण्याची वेळ येत आहे. आजवर या प्रकल्पाच्या कामावर 240 कोटी रुपये आणि भाववाढीसाठी 40 कोटी असे 280 कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रकल्पाची 75 टक्के रक्कम खर्च करूनही झालेले काम तुकड्या तुकड्यांमध्येच आहे.
सलग काम न झाल्याने केलेल्या कामाचा वापर वाहनचालकांकडून फारसा होत नाही. त्यातच नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन झाल्याने शिवणे-खराडी नदीपात्रालगतच्या रस्त्याचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यात शिवणे-खराडी रस्त्याचा एक भाग असलेला रजपूत वस्ती ते महापालिकेसमोरील टिळक पूल या दरम्यानचा नदी पात्रातील रस्ता काढण्यात येणार आहे. नदीपात्रातील हा रस्ता काढल्यानंतर म्हात्रे पूल ते संगमवाडी दरम्यान महापालिकेने काय नियोजन केले आहे, याची माहिती ना पथ विभागाकडे आहे, ना प्रकल्प विभागाकडे. यामुळे शहराच्या पूर्व पश्चिम विना वाहतुककोंडी प्रवास करण्याचे पुणेकरांचे स्वप्न अधुरेच राहणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
नदीकाठ सुशोभीकरणाच्या प्रकल्पांतर्गत संगमवाडी ते मुंढवा दरम्यान नदीच्या दक्षिण बाजूने पीपीपी तत्वावर नदी काठावर रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवणे-खराडी रस्ता प्रकल्पांतर्गत नदीच्या उत्तरेस केलेल्या तुकड्या तुकड्याच्या रस्त्याचा कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया जाणार आहे.
कर्वे नगर परिसरातील आंबेडकर चौक ते दुधाणे लॉन्स दरम्यानत रस्ता रखडला आहे. ज्या ठिकाणी रस्ता थांबला आहे, तेथून पुढे शंभर मी. वर एकाच बाजूचा रस्ता झाला आहे. असे असताना या ठिकाणी पदपथ बांधण्याचे काम जोरदार सुरू आहे. त्यामुळे रस्ता नसताना पदपथाचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवणे ते कर्वेनगर हा 2.25 किलो मीटरचा रस्ता नदीपात्रत (पूर रेषेमध्ये) येत असल्याने तो रद्द करण्यात आला. त्यामुळे हा रस्ता कर्वे रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून इंगळे नगरमधून दुधाने लॉन्सकडे, तिथून पुणे महालक्ष्मी लॉन्सपासून राजाराम पूलाजवळ नदी लगतच्या डी.पी. रस्त्याला जोडण्यात येणार आहे.
हा रस्ता आंबेडकर चौकापासून जवळपास 500 मिटर भूसंपादनाअभावी होऊ शकलेला नाही. दुधाणे लॉन्सपासून डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंग्लिश स्लुकपर्यंत दोन पदरी रस्ता आहे. तिथून पुढे पुन्हा तो रखडला आहे. पुन्हा काही अंतरावर रस्त्याची एकच बाजू झाली असून, दुसरी माजू रखडली आहे. त्यानंतर पुढे महालक्ष्मी लॉन्सच्या पाठीमागे पुन्हा पंन्नास मिटरची एकच बाजी तिही अर्धवटच झाली असून पुढील काम थांबले आहे.