पुणे; पुढारी वृत्तसेवा: शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची पाच वर्षांनी चारित्र्य पडताळणी होणार आहे. त्याचबरोबर शाळा परिसरात सीसीटीव्ही बसविणे, दर्शनी भागात हेल्पलाईन नंबर लावणे, तक्रार पेटी ठेवणे यांसारख्या उपाययोजना करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. भिगवण येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे. पालकांच्या लेखी परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीची भेट घेता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. शाळेतून विद्यार्थी बाहेर जाणार नाही, यासाठी सुरक्षारक्षकांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.
शाळांमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दर 5 वर्षांनी चारित्र्य पडताळणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल प्रतिकूल असल्यास अशा कर्मचार्यास वेळीच समज किंवा शिक्षा देण्यात यावी आणि त्याबाबत तात्काळ वरिष्ठ कार्यालयास कळवावे. शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कुमारवयात मुलांना शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते त्यासाठी शालेय स्तरावर आरोग्य शिबिर आयोजित करून नामांकित डॉक्टर, समुपदेशक यांना आमंत्रित करावे.
विद्यार्थ्यांना गुड आणि बॅड टचची माहिती द्यावी. तसेच मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समिती गठित करावी, असे आदेशही शाळांना देण्यात आले आहेत. शाळेतील सर्व प्रांगण, कॉरिडॉर, प्रयोगशाळा, व्यायाम शाळा, स्वच्छतागृह परिसर या ठिकाणी हे सीसीटीव्ही बसवून दर दोन दिवसांनी ते चालू आहेत की नाही, याची खात्री करावी लागणार आहे. शाळेतील मुख्य प्रवेशद्वार, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, व्यायाम शाळा, स्वच्छतागृहे, सर्व खिडक्या, दरवाजे योग्य प्रकारे बंदिस्त असल्याची खात्री करावी अथवा निकामी झालेले दरवाजे तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जनजागृती करण्याच्या हेतूने नियमावलीची पुन्हा एकदा अंमलबजाणी करण्यात येत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये शाळेने पीडित विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. अशा घटना घडल्यास वरिष्ठ कार्यालयास तात्काळ कळवावे.
आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
तक्रार पेटी आणि सिक्युरिटी बेल…
शाळेच्या दर्शनी भागात चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098, पोलिस सुरक्षा नंबर 100, महिला सुरक्षा नंबर 1090 व तत्काळ सेवा 112 आदींबाबत माहितीचे फलक लावावेत. तसेच, विद्यार्थ्यांना गोपनीयरीत्या तक्रार नोंदविण्यासाठी शाळेत तक्रार पेटी ठेवावी. तक्रार पेटीत प्राप्त झालेल्या अर्जावर तत्काळ उचित कार्यवाही करावी. महत्त्वाचे म्हणजे तक्रार पेटीवर जिल्हा कार्यालयाचा पत्ता लिहावा. शाळेत जागोजागी विद्यार्थ्यांचे हात पोहोचतील, अशा उंचीवर सिक्युरिटी बेल बसवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.