शिकलकर टोळीचा पर्दाफाश करणारे भिगवण पोलिस पथक. 
पुणे

पुणे : शिकलकर टोळीचा पर्दाफाश

अमृता चौगुले

भिगवण, पुढारी वृत्तसेवा : भिगवण येथून चोरीस गेलेल्या गाडीचा शोध भिगवण पोलिसांनी तर लावलाच, शिवाय पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्‍या व पोलिसांना हैराण करून सोडणार्‍या शिकलकर टोळीचा पर्दाफाश करीत 39 गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी तिघांना जेरबंद केले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

शिकलकर टोळीतील जीतसिंग राजपालसिंग टाक (वय 26, रा. वैदवाडी, हडपसर पुणे), लकीसिंग मन्नूसिंग टाक (वय 20, रा. यवत, ता. दौंड) व एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. भिगवण येथील चोरी केलेली महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ (एमएच 14 बीएक्स 9764) घेऊन आरोपी तुळजापूरला दर्शनाला गेले खरे; मात्र त्यांची ही चोरी पचली नाही आणि आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्याचाही घडा भिगवण पोलिसांच्या माध्यमातून भरला.

याचे झाले असे की, दि. 19 ते 20 जुलै दरम्यान भिगवण येथील बसस्थानकाजवळून स्कार्पिओ गाडी चोरीला गेली होती. याबाबत भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर या गाडीचा शोध सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या गुन्हा शोध पथकाकडून सुरू असताना त्यांना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे आरोपी तुळजापूरला गेल्याचे समजले. यावरून भिगवण व तुळजापूर पोलिसांनी संयुक्त पथकाने मोठ्या शिताफीने कारवाई करीत तिघांना गाडीसह ताब्यात घेतले. त्यांनी भिगवण येथील स्कार्पिओ चोरीची कबुली दिली. त्याचबरोबर अधिक चौकशी करता पुणे शहर आयुक्तालय हद्दीत 30 गंभीर गुन्हे, पिंपरी चिंचवड आयुक्त हद्दीत सात गंभीर गुन्हे व पुणे ग्रामीणमध्ये इंदापूर, हवेलीत दोन गंभीर गुन्हे असे एकूण 39 गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली.

या घटनेचा तपास ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम आदींच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT