पुणे

पुणे : व्हीआयपींच्या दौर्‍यामुळे शहरात वाहतूक कोंडी

अमृता चौगुले

पुणे : शहरात एकीकडे गणेशोत्सवानिमित्त भक्तांची गर्दी होत असताना दुसरीकडे व्हीआयपींच्या दौर्‍यामुळे पुणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरिकांची पर्यायी मार्ग शोधताना दमछाक झाली. शुक्रवारी शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह इतर व्हीआयपींचा दिवसभर राबता होता. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

त्यामुळे ठरावीक रस्त्यावरच रहदारी होत असल्यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. आठ ते नऊ व्हीआयपी व्यक्ती एकाचवेळी शहरात आल्यामुळे त्याचा ताण वाहतूक पोलिसांवर पडल्याचे दिसून आले. त्यांचा मार्ग मोकळा करून द्यावा लागत असल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक थांबवावी लागत होती.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते लहान झाले आहेत, तर काही ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळेदेखील वाहतुकीवर ताण पडला. अशातच आता शनिवार आणि रविवार सुट्या लागून आल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तर पोलिसांना वाहतुकीचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

पालिका भवनासमोर कोंडी
महापालिका भवन परिसरात शुक्रवारी सायंकाळी कोंडी झाली. तासभर कोंडीत अडकून पडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ई-बस महापालिका भवन परिसरात आणण्यात आल्या. ई-बस महापालिका भवन येथील पीएमपी स्थानकात आल्यानंतर या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. जंगली महाराज रस्ता तसेच महापालिका भवन, कुंभारवाडा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT