पुणे

पुणे : वेल्हा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या वेल्हे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दरम्यान कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वेल्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आदी सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत.

वेल्हे येथे एक बाधित रुग्ण सापडला आहे. बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. बाधित रुग्णावर घरी उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चांगली आहे, असे वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी सांगितले.

वेल्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात जवळपास 500 रुग्णांवर कोरोनाच्या तिन्ही लाटेत उपचार करण्यात आले. शहरात ऑक्सिजनची कमतरता असताना वेल्हेसारख्या दुर्गम ठिकाणी रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन आणि उपचार मिळाले. त्यामुळे काही गंभीर रुग्णांचा अपवाद वगळता अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचले. यात 80 पेक्षा अधिक वय असलेले वृद्धही आहेत.

तालुक्यातील पहिला रुग्ण

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही राज्याच्या ग्रामीण भागातील पहिला रुग्ण वेल्हे तालुक्यात सापडला होता. तसेच जिल्ह्यातील पहिल्या कोविड रुग्णाचा मृत्यू वेल्हे तालुक्यात झाला होता. या पार्श्वभूमीवर आता पहिला रुग्ण सापडल्याने प्रशासनाने योग्य खबरदारीच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी सर्व अद्ययावत सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित करण्यात आला आहे. व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन बेड, आवश्यक औषधे आदींचा पुरेसा साठा आहे. पुरेसे बेड उपलब्ध आहेत.
डॉ. परमेश्वर हिरास, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वेल्हे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT