पुणे

पुणे विभागीय आयुक्त बदलण्यासाठी लॉबिंग?

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सरकार बदलले की प्रशासकीय अधिकार्‍यांवरही बदल्यांची टांगती तलवार राहते, हे चित्र आजवर अनेकदा पाहायला मिळाले आहे. 'सध्याचे विभागीय आयुक्त 'आपले' नाहीत. नवीन विभागीय आयुक्तांसाठी 'लॉबिंग' करावे लागेल, आपल्याकडून तीन नावे पाठवून देऊ,' अशी चर्चा मंगळवारी रात्री सांगली जिल्हयातील कार्यकर्त्यांंमध्ये ऐकायला मिळाली. आपली नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, अशी चर्चाही रंगली होती.

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौर्‍यावर आले होते. तेव्हा त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी सांगली जिल्ह्यातील काही कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. पुण्याच्या विभागीय आयुक्तांविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी, 'या पदासाठी 'लॉबिंग' करावे लागेल, मी तीन नावे तुम्हाला देतो, त्यापैकी एखाद्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करता येईल,' असे आश्वासन एका आमदाराने कार्यकर्त्यांना दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नवीन सरकार सत्तेत आल्याने प्रशासनातही बदलीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांतील नेत्यांकडून आपल्या मर्जीतील प्रशासकीय अधिकार्‍यांची वर्णी लावण्याची रस्सीखेच सुरू असते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तपदासाठी आता काय 'फिल्डिंग' लावली जाणार आणि नवीन अधिकार्‍यांची वर्णी लागणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT