पुणे

पुणे विद्यापीठाला 10 कोटी; अजित पवार यांची घोषणा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विकासकामासाठी आणि जलतरण तलावासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल,' अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. विद्यापीठातील पै. खाशाबा जाधव क्रीडासंकुलातील पॅव्हेलियन इमारत, इनडोअर हॉल आणि अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दीपक माने, क्रीडासंकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, 'विद्यापीठात अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.

राज्यातल्या कुठल्याही भागात समाजहितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकासाठी देखील सहकार्य करण्यात येईल. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे विद्यापीठ घडविण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा. विद्यापीठाबाबतीत आपलेपणाच्या भावनेने सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे. प्रत्येक विद्यार्थी आपला असल्याची भावना अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांनी दाखवावी.

' सामंत म्हणाले, 'पुण्याच्या शैक्षणिक पंढरीत अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून पुण्याला देशपातळीवर लौकिक वाढविण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम करणारे शिक्षण विद्यापीठात मिळायला हवे. यासाठी विद्यापीठ आणि शासनाला मिळून काम करावे लागेल. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी 13 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्यात येत आहेत.'डॉ. काळे यांनी विद्यापीठ कामकाजाचा आढावा घेतला. पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळ दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले.

विद्यापीठात बोलवत नसल्याची खंत

'उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या आग्रहाखातर विद्यापीठात आलो, नाहीतर मला बोलवत नाहीत त्या ठिकाणी मी बळंच चला चला म्हणत जात नाही. तो माझा स्वभाव नाही,' असे म्हणत अजित पवारांनी विद्यापीठातील कार्यक्रमांना बोलविले जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. बोलवत नाही, तरी विद्यापीठाचे कोणतेही काम थांबविले नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासाठी आवश्यक परवानग्या पाच मिनिटांत मिळवून दिल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी अधिकार्‍यांना सुनावले

अजित पवार विकासकामांमधील गुणवत्तेबाबत आग्रही असल्याचा अनुभव विद्यापीठातदेखील आला. एका ठिकाणी हॉलच्या सीलिंगच्या उंचीत फरक दिसल्यानंतर पवारांनी तो अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिला. तसेच, 'आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काय काम केले?' अशी विचारणाही केली. त्यावर अधिकार्‍यांनी, 'अंजली भागवत यांनी तशा सूचना केल्या,' असे सांगितले. 'अंजली भागवतने तुम्हाला चांगलीच सूचना केली. मात्र, तुम्ही ती उंची चुकीची केली. त्याबाबत मी सांगत आहे,' असे म्हणत पवारांनी अधिकार्‍यांना सुनावले.

https://youtu.be/YepUS0JEz38

SCROLL FOR NEXT