पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने 130 प्राध्यापकांची 5 सप्टेंबरपर्यंत भरती केली जाईल,' अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सोमवारी दिली. विद्यापीठाला आता 200 हून अधिक प्राध्यापक मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठात प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. अनेक विभाग प्राध्यापकांअभावी सुरळीत पद्धतीने चालवता येत नाहीत. यामुळे आता आणखी 130 प्राध्यापक कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
याशिवाय विद्यापीठाकडून अर्थसाह्य करून भरण्यात येणारे कायमस्वरूपी प्राध्यापकही नेमले जातील, असे डॉ. काळे यांनी सांगितले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाचा दर्जा काहीसा घसरला होता. या रँकिंगमध्येही विद्यापीठात प्राध्यापकांची कमतरता असल्याने विद्यापीठावर ठपका ठेवण्यात आला होता. भविष्यात असे घडू नये, आणि एनआयआरएफमधील विद्यापीठाची श्रेणी सुधारावी, यासाठी आता कंत्राटी पद्धत आणि स्वयंअर्थसहाय्यित पद्धतीने प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
प्राध्यापक भरतीसाठी आम्ही योजना तयार केली आहे. 5 सप्टेंबरपर्यंत 130 प्राध्यापकांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल. याशिवाय उर्वरित प्राध्यापकांच्या 140 जागा भरण्यात आल्या होत्या. त्यातील रिक्त जागांची माहिती घेऊन त्यांच्या जागीही प्राध्यापक नेमले जातील. भविष्यात विद्यापीठाला प्राध्यापकांची कमतरता भासणार नाही.
– डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ