लोणी-धामणी, पुढारी वृत्तसेवा : लोणी-मंचर रस्त्यावर जारकरवाडी फाटा ते देशमुखवस्तीदरम्यान खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांचीही मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, या रस्त्याची महिनाभरापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती.
आंबेगाव तालुक्यातील मंचरची कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लोणी येथील उपबाजार समितीला हा रस्ता जोडतो, यामुळे तो तालुक्यातील दळणवळणाचा एक प्रमुख मार्ग आहे. एक महिन्यापूर्वी या रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविले होते. पण, त्यानंतर सतत पाऊस पडल्याने पुन्हा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.