पुणे

पुणे : लोणी देवकर परिसरात मेंढपाळाच्या ५० मेंढ्या मृत्यूमुखी

अमृता चौगुले

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर (एमआयडीसी) परिसरात गिरीम (ता. दौंड) येथील मेंढपाळ भिवा रामा झिटे यांनी चरावयास आणलेल्या कळपातील जवळपास ५० मेंढ्या मृत्यूमुखी पडलेल्या असून मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अजून जवळपास ३० ते ४० मेंढ्या अत्यवस्थ परिस्थितीत असल्याचे भिवा रामा झिटे यांनी सांगितले. मेंढपाळ झिटे हे गेली १५ दिवसांपासून इंदापूर परिसरात मेंढ्यांचा कळप घेऊन आहेत. परंतु मंगळवारपासून मेंढ्यांचे कान सुजने, डोळे सुजने, ताप अशी लक्षणे आढळू लागली. मेंढ्या मृत्यूमुखी पडू लागल्या. त्यामुळे शुक्रवारी दुपारी झिटे यांनी इंदापूर पशु संवर्धन विभागास संपर्क करून याबाबत माहिती दिली.

तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पशुधन विकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे यांनी वैद्यकीय डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी पाठवून मेंढ्यांवर औषधोपचार सुरू केले व सदरील ठिकाणी जाऊन पाहणी केली. १६ जुलै रोजी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी सदरील ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. ते म्हणाले की, ही घटना समजताच स्थानिक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांनी मेंढ्यांवर आवश्यक औषध उपचार सुरू केले आहेत.

मेंढ्या कोणत्या कारणाने दगावल्या हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समझेल. इंदापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मेंढ्या मृत्यूमुखी पडण्याची ही तिसरी घटना आहे. यामध्ये मेंढपाळाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांनी यावेळी केली आहे. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, डॉ. संजय पराडे, डॉ. भीमराव जानकर, डॉ. मारुती काझडे, डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांसह रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, तालुका संपर्कप्रमुख आण्णा पाटील, गुलाब घुले आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT