पुणे

पुणे : लूटमार करणारे दोघे ताब्यात

अमृता चौगुले

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण भागात लूटमार करून सामान्यांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या लातूरच्या दोन युवकांना भिगवण पोलिस व लातूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून लुटलेला तब्बल 92 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

शुभम प्रकाश जाधव (वय 21, रा. काळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) व वैभव व्यंकट सांगोळे (वय 21, रा. बँक कॉलनी, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी जेरबंद करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी माहिती दिली.

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दि. 26 मे रोजी रात्री तीन वाजता हॉटेल भोसलेजवळ अज्ञात चोरट्याने एका इसमास लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडून हिरोहोंडा सीबीझेड व एक मोबाईल तसेच रोख रक्कम तीन हजार असा एकूण 40 हजारांचा ऐवज लुटला होता. त्यानंतर दि. 31 मे रोजी भिगवणच्या मुख्य बाजारपेठेतून युनिकॉन मोटरसायकल चोरीस गेली होती. या चोरीचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास चालू असताना लातूर भागातील दोन संशयित असल्याचे भिगवण पोलिसांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती आधारित कळले होते. त्यावरून लातूर पोलिसांच्या मदतीने भिगवण पोलिसांनी समांतर तपास सुरू करून जाधव व सांगोळे यांना संशयातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. या वेळी त्यांनी ही लूटमार केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

लातूर भागातही अशा पद्धतीने गुन्हे केल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम, विनायक दडस पाटील व पथकाने केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT