पुणे

पुणे : ‘रोजचे मढे त्याला कोण रडे’; पुणे-सातारा सेवा रस्त्याचे ओढ्यात रूपांतर

अमृता चौगुले

खेड शिवापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवगंगा खोर्‍यातील स्थानिक जनता पुणे-सातारा सेवा रस्त्याला वैतागले असून, 'रोजचे मढे त्याला कोण रडे' या म्हणीप्रमाणे सेवा रस्त्याकडे दुर्लक्ष करणे एवढेच त्यांच्या हातात आहे. याचे कारण म्हणजे या सेवा रस्त्याला सध्या ओढ्याचे स्वरूप आले आहे. रोजच येथे अपघात होत आहेत. मात्र, वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना सांगूनही ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

पुणे-सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी ते शिवरे (ता. भोर) या सुमारे नऊ किलोमीटर दरम्यान चार उड्डाण पूल आहेत. या उड्डाण पुलाशेजारी किंबहुना या दरम्यानच्या असणार्‍या गावात जाण्यासाठी सात मीटर रुंदीचे सेवा रस्ते केले आहेत. हे सेवा रस्ते काही ठिकाणी सात मीटर नसून अरुंदच आहेत. त्यातच हे सेवा रस्ते पूर्णपणे उखडले असून त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे.

हा सेवा रस्ता आहे की ओढा? आणि सेवा असेल तर तो कोठे आहे? हे त्या रस्त्यावरील परिस्थिती पाहिल्यावर स्पष्ट होत आहे. त्यामुळे आठवड्यात सुमारे तीन ते चार अपघात होत असून विद्यालयात जाणारे विद्यार्थीसुद्धा जखमी झालेले आहेत. विशेषतः वेळू (ता. भोर) ते कोंढणपूर फाटा व खेड शिवापूर (ता. हवेली) दरम्यान सेवा रस्तेच गायब असल्याचे चित्र दिसत आहे. ही माहिती दिली असता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यादव म्हणाले की, मी ताबडतोब त्याठिकाणी कर्मचारी पाठवून खड्डे बुजवून घेण्यास सांगतो.

या सेवा रस्त्यादरम्यान अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी स्वतःचे ड्रेनेज लाईनचे काम करणे गरजेचे आहे. राहिला प्रश्न तो खड्ड्याचा, तर त्याचे काम गुरुवारी निश्चितपणे सुरू करणार आहे. तसेच पावसाळा संपल्यानंतर पूर्ण सेवा रस्त्याचे डांबरीकरण करणार आहे.
संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT