पुणे

पुणे : राखीव जागांवर प्रवेशच दिले नाहीत; ‘एफटीआयआय’मधील प्रकार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अपात्रतेचे कारण पुढे करीत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेने ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशच दिले नसल्याचे उघड झाले आहे. संस्थेने शैक्षणिक वर्ष 2021 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे. ज्या आरक्षणाच्या आधारे हे प्रवेश होणार आहेत, त्या आरक्षणाच्या तरतुदींचीच चेष्टा करण्यात आल्याचा आरोप एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनने केला आहे.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एफटीआयआय प्रशासनासमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले असता अनेक उमेदवारांनी कटऑफची टक्केवारी (ओबीसी 45 टक्के, एससी आणि एसटी 40 टक्के, जनरल 50 टक्के) प्राप्त केलेली नाही. मात्र, हे आकडे कसे आणि कोणाकडून आले, याबद्दल कोणतीही पारदर्शकता नाही. या निकषांची वैधताच विवादास्पद आहे. या श्रेणींमध्ये पात्र विद्यार्थी मिळत नाहीत म्हणून राखीव जागांवर सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असेही प्रशासन उद्या म्हणू शकते.

ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवार नसताना केवळ विशेषाधिकार प्राप्त, सामान्य जागांसाठी इच्छुक असलेले उमेदवारच कटऑफ उत्तीर्ण होऊ शकतात, हेदेखील अत्यंत शंकास्पद आहे. या प्रक्रियेद्वारे सर्वसाधारण प्रवर्गातील सर्वांसाठी खुल्या ठेवल्या जाणार्‍या जागा इतर प्रवर्गातील लोकांसाठीही बंद ठेवल्या जातील. संस्थेत प्रवेश घेणारे विद्यार्थी मूलभूत सामाजिक हक्कांवर होणार्‍या हल्ल्यांविरुद्ध आवाज उठवता कामा नयेत, म्हणून त्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे.

संस्थेच्या स्वनिर्मित नियमांच्या आड लपून आरक्षणाच्या कायद्याचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे, असे सांगत राखीव श्रेणींसाठी पात्रता निकष धोरण रद्द करावे तसेच निकालाचे पुनर्मूल्यांकन करावे, या मागणीसाठी एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनने शुक्रवारी आंदोलन केले. या विषयी एफटीआयआयचे संदीप शहारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT