निरा, पुढारी वृत्तसेवा : निरा (ता. पुरंदर) येथील रयत संकुलातील दोन्ही विद्यालयांच्या पटांगणावर गावातील पावसाचे पाणी वाहून आल्याने तळे साचले आहे. तळ्यात मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने विद्यार्थी व शिक्षकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शाळेच्या पटांगणाची ग्रामपंचायतीने स्वच्छता करून मुरुमीकरण करण्याची मागणी होत आहे.
निरा येथील रयत संकुलात महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय, मुलींची सौ.लि.रि.शहा कन्याशाळा आहे. गेल्या अडीच वर्षापासून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा नं.1 व 2 रयत संकुलाच्या प्रांगणात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या 16 वर्ग खोल्यात सुरू आहेत. त्यामुळे रयत संकुलातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी तसेच जि.प. शाळेतील सुमारे 550 विद्यार्थी या प्रांगणात दररोज वावरत असतात. सध्या पावसाच्या पाण्यामुळे संकुलाच्या प्रांगणात तळे निर्माण झाले आहे. तळ्यात गवत उगवल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. परिणामी विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
गावच्या मुख्य चौकातील जलसंपदा विभागाच्या वसाहतीतून पावसाचे पाणी वाहत रयत संंकुलातील दोन्ही शाळांच्या सामाईक पटांगणातून बाहेर जात असते, परंतु कन्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून बांधकामाचे साहित्य इमारतीजवळ पडल्याने पावसाचे पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी पटांगणात साचून राहिले आहे.
शाळेने पटांगणाची स्वच्छता करून भर टाकण्याची मागणी केल्याचे 'रयत'चे पश्चिम विभागीय सल्लागार लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले.