पुणे

पुणे : मोरीच्या कमी उंचीमुळे रस्त्यावर पाणी

अमृता चौगुले

भोर, पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यातील निगुडघर ते म्हसर रस्त्यावरील म्हसर बुद्रुक हद्दीत असणार्‍या रस्त्यावरील मोरीची उंची कमी आहे. संततधार पावसाने ओढ्याला आलेले पाणी मोरीवरून रस्त्यावर वाहत असून, वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे.

म्हसर बुद्रुकमधील म्हसुरकर आवड ते प्राथमिक शाळा, शिर्के आवड, पोळवाडीसह गावात जाणार्‍या मुख्य रस्त्यादरम्यान ओढ्यावर असलेल्या मोरीची उंची कमी आहे. ओढ्यातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाणी मोरीत मावत नसून मोरीवरून वाहत आहे. नागरिक, विद्यार्थी, वाहनांना वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. सध्या मुसळधार पावसाने येथील पाण्याचा प्रवाह वेगवान आहे. परिणामी, नागरिक व वाहनधारकांना मोरीवरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे माजी सरपंच प्रशांत राजेशिर्के यांनी म्हटले आहे.

साकव उभारण्याची मागणी

मोरीवरून धोकादायक पद्धतीने ये-जा ज्यांना जमत नाही, त्यांना गावाच्या वरील बाजूने लांब रस्त्यावरून पायपीट करावी लागत आहे. उपसरपंच देवा मसुरकर यांनी ग्रामस्थ व विद्यार्थी यांना सोयीसाठी साकव उभारण्याची मागणी केली आहे.

SCROLL FOR NEXT