मोरगाव, पुढारी वृत्तसेवा : मोरगावसह परिसरात तीर्थक्षेत्र मयूरेश्वर मंदिरासह अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. जेजुरी, सोमेश्वर, सुपा, लोणीभापकर आदी तीर्थक्षेत्रांनाही भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, योग्य नियोजनाअभावी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मोरगाव बसस्थानकात नियंत्रण कक्षाची गरज भेडसावत आहे.
मोरगाव परिसरात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बाहेरगावी नियमित प्रवास करणारे पासधारकही आहेत. मात्र अशा सर्वांना वेळेत बस न आल्याने नाहक त्रास होत असतो. मोरगाव येथे पास मिळण्याची सोय नसल्याने पासधारकांना बारामती येथे जाऊन पास काढावा लागतो. त्यासाठी एकशे दहा रुपये एसटी भाड्यावर खर्च करावे लागतात. विशेषत: याबाबत पालकांमध्ये नाराजी आहे. तसेच मोरगावातून बारामतीकडे जाणारी सकाळची एसटी बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने जाणे भाग पडते. याबाबत बारामती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फक्त सकारात्मक मत प्रदर्शित केले. संबंधित विभागप्रमुखाने याठिकाणी नियंत्रण कक्ष ठेवल्यास प्रवाशांना सुविधा प्राप्त होतील.
बारामतीच्या आगाराच्या काही एसटी बस रस्त्यावरच थांबून प्रवाशांची चढ-उतार करतात. एसटी बस स्थानकात गेल्यास प्रवाशांना बसस्थानकात थांबणे क्रमप्राप्तच होईल. मन मानेल त्या पद्धतीने थांबल्यामुळे प्रवाशांना बस मिळविण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. अशावेळी बस मिळविण्याच्या गडबडीत अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
मोरगाव बसस्थानकात नियंत्रण कक्ष नाही.