पुणे

पुणे : मास्टर रुमसे रिपेअरींग करके लाता हूं,’ असे म्हणत शिक्षकांकडुन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तीन शिक्षकांनी 10 वीतील तीन विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नाना पेठेतील ऑर्नेलाज हायस्कूलमध्ये घडला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी शाळेतील तिघा शिक्षकांविरुद्ध बाल न्याय अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत येरवडा येथे राहणार्‍या एका मुलाच्या पालकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑर्नेलाज हायस्कूल येथे 28 जुलै रोजी दुपारी एक वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींंचा मुलगा 10 वीमध्ये शिकत आहे. तास सुरू असताना वर्गात मस्ती केली, म्हणून एका शिक्षकांनी तिघांना बाहेर बोलावून पृष्ठभागावर छडीने मारले.

त्यानंतर तास सुरू असलेल्या सरांना 'मास्टर रुममे से रिपेअरींग करके लाता हूं,' असे म्हणून ते तिघांना घेऊन स्टाफ रूममध्ये गेले. तेथे तिघा शिक्षकांनी या मुलांना बेदम मारहाण केली. हे तिघे गुडघ्यावर बसून माफी मागत असतानाही शिक्षकांनी पुन्हा मारहाण केली. त्यांना इंटरर्नलचे मार्क न देण्याची धमकी देऊन भीती घातली. त्यामुळे ही मुले घरी काहीही सांगायला तयार नव्हती. शेवटी रात्री उशिरा फिर्यादींनी मुलाला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर त्याने रडत रडत सर्व प्रकार सांगितला. त्यांनी ससून रुग्णालयात मुलावर उपचार केल्यानंतर रात्री पोलिसांकडे फिर्याद दिली.

SCROLL FOR NEXT