पुणे

पुणे : महिलांसाठी बस कागदावरच; तेजस्विनी बसमध्ये पुरुष प्रवाशांचीच गर्दी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीने महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बस आता फक्त कागदावरच महिलांसाठी असल्याचे दिसत आहे. कारण पीएमपीच्या या बसमध्ये अनेकदा पुरुषांचीच गर्दी दिसते. यामुळे या बसला महिला विशेष बस कसे म्हणायचे, असा प्रश्न महिला प्रवाशांना पडला आहे. पीएमपीच्या तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी महिला दिनानिमित्त महिलांसाठी 'तेजस्विनी' बस गाड्या सुरू केल्या. या बसमार्फत फक्त महिलांनाच प्रवास करता येणार होता.

तर दर महिन्याच्या 8 तारखेला या बसमधून महिलांना दिवसभर मोफत प्रवास करता येणार होता. त्यानंतर पीएमपीने या महिला विशेष गाड्या अजूनही सुरू ठेवल्या खर्‍या, मात्र सध्या त्या फक्त कागदावरच असल्याचे दिसत आहे. शहरात केलेल्या पहाणीदरम्यान 'तेजस्विनी' या महिला विशेष गाडीमध्ये महिलांसोबत पुरुष प्रवाशांचीच मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे दर महिन्याच्या 8 तारखेलादेखील महिलांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. यामुळे महिला प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

14 मार्गांवर 19 गाड्यांमार्फत महिला विशेष सेवा
अक्र. मार्ग बससंख्या डेपो
1) स्वारगेट – धायरी- मारुती मंदिर 01 स्वारगेट
2) अ.ब.चौक – सांगवी 01 न.ता.वाडी
3) मनपा भवन – लोहगाव 01 न.ता.वाडी
4) कात्रज- महाराष्ट्र हौ. बोर्ड 02 कात्रज
5) कात्रज- कोथरूड डेपो 02 कात्रज
6) मनपा भवन- आकुर्डी रेल्वे स्टेशन 02 निगडी
7) निगडी-भोसरी 01 निगडी
8) निगडी- हिंजवडी माण फेज 3 01 निगडी
9) हडपसर- वारजे माळवाडी 02 हडपसर
10) भेकराईनगर- मनपा भवन 02 हडपसर
11) मार्केट यार्ड -पिंपळे गुरव 01 मार्केट यार्ड
12) एनडीए गेट- एनडीए मार्गे मनपा (वर्तुळ) 01 कोथरूड
13) पुणे स्टेशन- कोंढवा खुर्द 01 पुणे स्टेशन
14) मनपा – निगडी 01 न.ता.वाडी

मला नेहमी पीएमपी बसने प्रवास करावा लागतो. पीएमपीच्या या महिला विशेष गाड्या दिसत नाहीत. वेळेवर उपलब्ध होत नाहीत. एखादी बस दिसली तर ती पुरुष प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे पीएमपीने महिलांसाठीच्या या विशेष गाड्यांमध्ये वाढ करावी व या गाड्यांमध्ये पुरुषांना प्रवास करण्यास बंदी करावी.
                                                                   – नंदा वीर, महिला प्रवासी

पीएमपीकडून महिलांसाठी विशेष सेवा सुरू आहे. सध्या महिलांसाठी मार्गावर गाड्या कमी पडत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पण पीएमपीकडे गाड्यांची मोठी कमतरता आहे. परंतु, तरीदेखील आम्ही येत्या काही दिवसांत महिला विशेष गाड्यांमध्ये लवकरच वाढ करणार आहोत.
                                         – सुबोध मेडशीकर, जनरल मॅनेजर, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT