जेजुरी, पुढारी वृत्तसेवा : नियोजित पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी जेजुरी शहरामध्ये सर्वेक्षण व मोजणीचे काम सुरू आहे. शहरातून जाणार्या रस्त्याच्या मध्य भागातून दोन्ही बाजूला रुंदीकरणाच्या खुणा न करता केवळ उत्तरेकडील बाजूला रुंदीकरणाच्या खुणा करून केवळ एकाच बाजूची जागा अधिग्रहण करण्याचा प्रयत्न असल्याने नागरिक व व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात जेजुरीकर नागरिकांनी पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सुळे यांनी नागरिकांचे गार्हाणे ऐकत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
अस्तित्वात असणार्या रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला समांतर रस्ता करावा अथवा सासवड व निरेप्रमाणे बाह्यवळण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत जेजुरीतील नागरिकांनी सोमवारी (दि. 29) सुळे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. त्यांचे म्हणणे सुळे यांनी ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून मंगळवारी (दि. 30) बैठक आयोजित केली. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, जयदीप बारभाई, राजेंद्र पेशवे, भाजपचे शहराध्यक्ष सचिन पेशवे, शिवसेनेचे शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.