पुणे / धायरी; पुढारी वृत्तसेवा: नांदेड सिटी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून कारवाई केली. या वेळी परदेशी तरुणीसह तिघींना ताब्यात घेण्यात आले. तर, मसाज सेंटरच्या मालक, मॅनेजरसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसाज सेंटर मालक मुंजा रामदास शिंदे (वय 31, रा. वडगाव), योगेश पवार (रा. नांदेड गाव), मॅनेजर अथर्व प्रशांत उभे (वय 19, रा. धायरी, बेनकरवस्ती), ज्योती विपुल वाळिंबे ( वय 30, रा. नर्हे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे, उभे आणि वाळिंबेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड सिटी परिसरात डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील ब्लू बेरी स्पा सेंटरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली असता, वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सीमा जगताप यांंनी मसाज सेंटरवर छापा टाकला. मसाज सेंटरमध्ये तरुणींना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी तरुणीसह तिघींना ताब्यात घेण्यात आले.
ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी
बनावट चावीच्या सहाय्याने घराचे कुलूप उघडून चोरट्यानी एका ज्येष्ठ महिलेच्या घरातून दोन लाख 95 हजार रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना कात्रज परिसरात समोर आली आहे. याप्रकणी एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला बिबवेवाडीत राहायला असून, त्यांचे कात्रज भागातील शेलारमळा परिसरात घर आहे. घरातून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी करणारे चोरटे माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सहायक पोलिस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.
वडगाव शेरीत दुकान फोडले
वडगाव शेरी परिसरातील एका मेडिकलचे शटर उचकटून ड्रॉवरमध्ये ठेवलेली साठ हजार रुपयांची रोकड लंपास केली.याप्रकरणी जगदीश देवाशी यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच येथील आंबेडकर वसाहती शेजारील म्हाडा बिल्डिंगमध्ये असलेल्या शिवदत्त डेअरीचे शटर उचकटून चोरट्यांनी 6 हजारांची रोकड चोरी केली. याप्रकरणी विकास कात्रे यांनी फिर्याद दिली आहे. वारजे परिसरातील प्रथमेश अपार्टमेंट शिवणे येथील एका सदनिकेच्या खिडकीतून किचनमध्ये हात घालून चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरट्यांनी उचलून नेला. प्रशांत क्षीरसागर यांनी याबाबत वारजे पोलिसात फिर्याद दिली आहे.
फसवणूक प्रकरणात एकाला जामीन
44 लाख 20 हजार 118 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमित देवराम कलाटे (वय 32, रा. वाकड चौक) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी जामीन मंजूर केला आहे. त्याने अॅड. सुधीर शहा आणि अॅड. राहुल भरेकर यांच्यामर्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 12 नोव्हेंबर 2016 रोजी हा प्रकार घडला. प्लॉटिंग डेव्हलपमेंटमधील रस्त्याच्या कामाच्या बदल्यात 44 लाख 20 हजार 118 रुपये रक्कम स्टॅमसह परत द्यायची होती. मात्र, आरोपीने त्याबदल्यात कासारसाई येथील साडेसहा गुंठे जागा देतो, असे सांगितले. प्रत्यक्षात जागा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
पावणेदोन कोटींना गंडा
नॉन बँकिंग फायनान्स कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या इतर साथीदारांना सोबत घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे 7 कर्ज प्रकरणे करून कंपनीची तब्बल 1 कोटी 82 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून सुमित भाऊ कांबळे (वय 36, रा. येरवडा) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश धोंडिराम टोंगळे (वय 31, रा. नेहरुननगर, पिंपरी) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जून 2020 ते 19 मे 2022 दरम्यान घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश टोंगळे हा या फायनान्स कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करीत होता. त्याने बनावट कागदपत्रांचे आधारे 5 कर्जदारांच्या नावे 7 कर्ज प्रकरणे सादर करून कंपनीकडून 1 कोटी 82 लाख 7 हजार 88 रुपयांची कर्जे मंजूर करून घेतली. दरम्यान, कंपनीच्या तपासात ही सर्व बनावट कर्ज प्रकरणे असल्याचे समोर आले. त्यानुसार कंपनीच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करीत आहेत.