पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'कोरोनाचा धोका तितकासा गंभीर राहिलेला नाही. मात्र, विविध विकारांचे आरोग्य क्षेत्रासमोर आव्हान आहे. मधुमेह, उच्चदाब यांसारखे आजार मोठी समस्या बनली आहे. 2017 साली प्रकाशित झालेल्या अहवालात दर वर्षी 40 लाख नागरिकांचा अशा विकारांमुळे मृत्यू होत असल्याचे म्हटले आहे. 2019 साली प्रकाशित झालेल्या अहवालात हे प्रमाण 68 लाख झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जगभरात कार्डिओ- मेटाबॉलिक आजारांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे, ' असे मत राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.
पुणे ऑबस्ट्रेटीक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटीतर्फे (पीओजीएस) आयोजित 'रिप्रोडकटीव्ह एंडोक्राइनोलॉजी (एनसीआरई )' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या'च्या उदघाटनप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. विमाननगर येथील हयात रिजेन्सी हॉटेल येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अलका कृपलानी होत्या. या वेळी 'पीओजीएस'चे अध्यक्ष डॉ. पराग बिनीवाले, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद दुगड, खजिनदार डॉ. चैतन्य गणपुले, सरचिटणीस डॉ. आशिष काळे, क्लिनिकल सेक्रेटरी डॉ. मंजिरी वळसंगकर, परिषदेच्या समन्वयक डॉ. राखी सिंग, डॉ. अमोल लुंकड आणि डॉ. पंकज सरोदे उपस्थित होते.
डॉ. जोशी म्हणाले, " एखाद्या आजाराबाबत संशोधन करत असताना प्राचीन भारतीय औषधोपचार आणि पद्धती यांना धुडकावून लावणे योग्य ठरणार नाही. आपल्या प्राचीन भारतीय साहित्यातील पुष्कळ गोष्टीवर पुन्हा काम करण्याची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून त्यावर टीका करण्यापेक्षा त्यातून चांगले विज्ञान निर्माण केले पाहिजे.