पुणे

पुणे : मतदारयादी सुधारण्याची संधी; 24 ऑक्टोबरपर्यंत पहिला टप्पा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यामध्ये 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र पुनरीक्षण होणार आहे. पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत 4 ऑगस्ट ते 24 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पहिला टप्पा असणार आहे. त्यामध्ये मतदान केंद्राचे सूसुत्रीकरण, प्रमाणीकरण करणे, दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांच्या पूनर्रचना करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येईल. 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येईल. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 9 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. तर, 26 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2023 रोजी करण्यात येणार आहे.

विशेष पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत आणि निरंतर पुनरिक्षणच्या काळामध्ये आगाऊ अर्ज करावेत. त्या अर्जावर निरंतर पुनरिक्षणच्या काळात मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारा तिमाहीच्या पहिल्या महिन्यात कार्यवाही करण्यात येणार आहे.

                                                       -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

SCROLL FOR NEXT