पुणे

पुणे : मतदार याद्यांचा घोळ संपेना; आकडेवारी जाहीर, मात्र अंतिम याद्यांचा पत्ता नाही

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीचा घोळ संपण्याचे नाव घेत नाही. प्रभागनिहाय याद्या जाहीर करण्याची मुदत उलटून गेली, तरी महापालिकेच्या संकेतस्थळावर अद्यापही अनेक प्रभागांच्या याद्याच उपलब्ध नाहीत.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जून महिन्यात प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या याद्यांवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. त्यावरील सुनावणी पूर्ण करून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी 21 जुलै ही मुदत दिली होती.

महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केल्याचा दावा केला, मात्र तो फोल ठरला आहे. याद्यांचा घोळ अद्याप संपला नसून, महापालिकेच्या संकेतस्थळावर एकूण 58 पैकी 31 प्रभागांच्याच याद्या उपलब्ध आहेत. यापूर्वी महापालिकेने प्रभागनिहाय केवळ मतदारांची एकूण संख्या जाहीर केली होती. परंतु मतदारांच्या याद्यांचा समावेश नव्हता. मतदार याद्यांमधील घोळ, मतदारांची संख्या, एकूण मतदार यांचा ताळमेळ लागत नसल्याने प्रशासनावर ही वेळ आली आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर शुक्रवारी (दि.22) रात्री उशिरापर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर होऊ शकल्या नव्हत्या. टप्प्याटप्प्याने प्रभागनिहाय याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत संपून चार दिवस गेल्यानंतरही संकेतस्थळावर 58 पैकी केवळ 31 प्रभागांतील मतदारांची अंतिम यादी सोमवारी (दि. 25) सायंकाळी उपलब्ध झाली.

क्षेत्रीय कार्यालयांत उपलब्ध होणार
महापालिका प्रशासनाकडून मतदार याद्या अंतिम झाल्या असून, त्याच्या प्रती छापण्यात येत आहेत. त्या छापील प्रती लवकरच क्षेत्रीय कार्यालयांत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या याद्यांवर मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही.

या प्रभागांच्या याद्या नाहीत
पूर्व खराडी-वाघोली, पश्चिम खराडी-वडगाव शेरी, वडगाव शेरी-रामवाडी, शनिवारवाडा-कसबा पेठ, छत्रपती शिवाजी स्टेडिअम-रास्ता पेठ, पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता, हडपसर गावठाण-सातववाडी, वानवडी गावठाण-वैदूवाडी, रामनगर उत्तमनगर-शिवणे, कर्वेनगर, शिवदर्शन-पद्मावती, कोंढवा खुर्द-मिठानगर, रामटेकडी-सय्यदनगर, वानवडी-कौसरबाग, काळे बोराटेनगर-ससाणेनगर, मोहम्मदवाडी-उरुळी देवाची, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी, अप्पर सुप्पर-इंदिरानगर, बालाजीनगर-शंकर महाराज मठ, वडगाव बुद्रुक-माणिकबाग, नांदेड सिटी-सनसिटी, खडकवासला-नर्‍हे, धायरी-आंबेगाव, धनकवडी-आंबेगाव पठार, चैतन्यनगर-भारती विद्यापीठ, सुखसागरनगर-राजीव गांधीनगर , कात्रज-गोकुळनगर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT