पुणे

पुणे : मंकी पॉक्स रुग्ण आढळल्यास जिल्ह्यात होणार सर्वेक्षण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात भविष्यात मंकी पॉक्सचा रुग्ण आढळल्यास अन्वेषण शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रुग्णांचे रक्त, रक्तद्रव आणि मूत्र हे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पुढील चाचणीसाठी पाठविण्यात येतील. प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मंकी पॉक्सचा एक रुग्ण म्हणजे साथरोगाचा उद्रेक अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे.

देशात केरळमध्ये 3 आणि दिल्लीमध्ये 1 असे 4 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणार्‍या सर्व प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी 2 ते 4 आठवड्यांत बरा होतो. मात्र, लहान मुले किंवा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

काय आहे आजार?
कांजण्या, नागीण, गोवर, सिफिलिस दुसरी स्टेज, हँड, फूट माऊथ डिसीज इत्यादी मंकी पॉक्ससदृश इतर आजार आहेत. मंकी पॉक्स आजारामुळे न्युमोनिया, सेप्सिस, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टीपटलाचा संसर्ग आदी गुतांगुंत निर्माण होऊ शकते. या आजाराचा मृत्युदर सर्वसाधारणपणे 3 ते 6 टक्के आहे. प्रयोगशाळेत पी. सी. आर. चाचणी अथवा सिक्वेन्सिंगद्वारे या आजाराचे निदान केले जाते.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये; परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या साथीप्रमाणे सर्व नियमांचे पालन करावे. आपल्या भागात एखादी मंकी पॉक्ससदृश लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तत्काळ विलगीकरण करावे. तसेच जवळच्या आरोग्यकेंद्रात दाखल करावे. आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
                                                 -डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक

SCROLL FOR NEXT