पुणे

पुणे : भांडण सोडवायला गेलेल्या चुलतीच्या डोक्यात पुतण्याने घातला दगड

रणजित गायकवाड

आळेफाटा (जि. पुणे), पुढारी वृत्तसेवा : सामायिक शेत जमिनीवर कर्ज काढण्यासाठी पतसंस्थेमध्ये सही करण्यास चुलता उशिरा गेला, याचा राग मनात धरून झालेल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या चुलतीच्या डोक्यात पुतण्याने दगड घातला. ही घटना राजुरी (ता. जुन्नर) परिसरात शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात पुतण्या जगदीश ज्ञानेश्वर औटी (रा. कमलामाता नगर राजुरी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजुरी परिसरातील कमलामाता नगर येथे औटी कुटुंबियांच्या तीन भावांची सामाईक जमीन आहे. त्यातील एका भावाचा मुलगा जगदीश ज्ञानेश्वर औटी यांना शेतीवर पतसंस्थेचे कर्ज काढायचे होते. तीन भावांची सामाईक जमीन असल्याने कर्जासाठी चुलत्याच्या सह्या लागत होत्या. चुलते सोपान कोंडीभाऊ औटी यांनी प्रथम आपण जमिनीची वाटप करू नंतर कर्ज काढण्याचा सल्ला पुतण्याला दिला. पुतण्या समजून घेत नसल्याने नारायणगाव येथील पतसंस्थेत जाऊन सही केली. सही करण्यासाठी उशिर केला याचा राग मनात धरून जगदीश यांनी घरी येऊन चुलते सोपान औटी यांच्या मुलीला शिवीगाळ तसेच दमदाटी करून तुझे लग्न कसे होते तेच बघतो अशी धमकी दिली. त्यानंतर सोपान औटी घरी आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारी राहत असलेल्या चुलत चुलती देऊबाई शंकराव औटी यांनी भांडण सोडविण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पुतण्या जगदीश औटी याने चुलतीला तुला काय करायचे आहे, तू मध्ये पडू नकोस असे म्हणून तिला सुद्धा शिवीगाळ करून थांब आधी तुझाच जीव घेतो असे म्हणत तेथे पडलेला दगड उचलून चुलतीच्या डोक्यात मारून तीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, देऊबाई औटी (वय ७०) गंभीर जखमी झाल्या असून त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डोक्यात दगड लागल्याने त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याप्रकरणी काजल सोपान औटी यांच्या फिर्यादीवरून चुलते जगदीश ज्ञानेश्वर औटी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी जगदीश औटी याला अटक केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहे.

SCROLL FOR NEXT