पुणे

पुणे : भरपावसात सुरू आहे रस्त्याचे काम

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : वाणेवाडी (ता. बारामती) ते मळशी या अडीच किलोमीटर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराला तब्बल आठ महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. वास्तविक हा रस्ता पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण होण्याची गरज असताना आता सुरू असलेल्या संततधार पावसात या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, पावसाळ्यात होणार्‍या या रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राहणार का? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे.

वाणेवाडीपासून मळशी येथील दिग्विजय जगताप वस्तीपर्यंतचा रस्ता दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे. संबंधित ठेकेदाराने सोमेश्वर कारखाना सुरू होण्याआधी डिसेंबर महिन्यापूर्वी रस्ता मोजणी करून रस्त्यावर मुरूम टाकला. रस्ता मंजूर झाल्यानंतर त्याचे काम वेळेत झाले असते तर प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले नसते. सध्या सोमेश्वर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. गेली आठ दिवस निरा खोर्‍यात पावसाचा जोर सुरू असताना ठेकेदाराला ऐन पावसाळ्यात हा रस्ता सुरू करण्याचा मुहूर्त मिळाला असल्याने पावसाळ्यात होणारा हा रस्ता टिकणार का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कामांच्या दर्जाबाबत नेहमीच भूमिका स्पष्ट करत असतात; मात्र ग्रामीण भागात विकासकामांच्या दर्जाबाबत कोणीही बोलत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

SCROLL FOR NEXT