सुवर्णा चव्हाण
पुणे : दर सोमवारी ते रानडे इन्स्टिट्यूटच्या कट्ट्यावर भेटतात, चहाचा घोट घेत गप्पांमध्ये रमतात. एकमेकांचे सुख-दु:ख वाटतात. कधी मनातील सगळेच मुक्तपणे शेअरही करतात. मैत्रीतील शेअरिंग अन् आधार त्यांनी एकमेकांमध्ये शोधला आहे. म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी या ज्येष्ठांचा मैत्रीचा कट्टा फुलतोच. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचार्यांनी हा मैत्रीचा कट्टा फुलवेलिा आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांनी एकत्र येऊन मैत्री जपण्यासाठी एक ग्रुप स्थापन केला आहे. त्या ग्रुपमधील सर्व 60 ते 90 वयोगटातील आहेत. दर सोमवारी रानडे इन्स्टिट्यूटच्या कट्ट्यावर हे 70 ते 80 ज्येष्ठ नागरिक एकत्र जमतात अन् मनसोक्त गप्पांमध्ये रंगतात.
एकमेकांना भेटण्यासाठी, सुख-दु:ख वाटण्यासाठी, एकमेकांशी मैत्रीचा बंध जपण्यासाठी अन् आयुष्य मित्रांसोबत जगण्यासाठी हे सगळे एकत्र येतात. विद्यापीठात इतकी वर्षे एकत्र काम केल्यानंतर त्यांच्यातील जुनी मैत्री आजही या ग्रुपच्या माध्यमातून टिकली असून, उतारवयात या सर्वांना एकमेकांचा मैत्रीचा आधार मिळाला आहे. राजा नेर्लेकर, विलास महाजन आदी मित्रांनी एकत्र येऊन हा ग्रुप 2011 साली स्थापन केला. तेव्हापासून हे ज्येष्ठ एकत्र येत आहेत. हे ज्येष्ठ सोमवारी एकत्र भेटतातच; पण वर्षातून एकदा बाहेरगावी फिरायलाही जातात. एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात.
एकमेकांच्या आनंदाच्या प्रसंगी मनसोक्तपणे पार्टीही करतात. त्याशिवाय एकमेकांना वाईट प्रसंगी मदत करतात. वयाची बंधने तोडून जपलेली ही मैत्री तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. रविवारी (दि. 7) साजर्या होणार्या मैत्री दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने त्यांच्यातील हा बंध जाणून घेतला. विलास महाजन सांगतात, 'आम्ही सगळे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर संपर्कात नव्हतो. पण, एकमेकांशी संपर्क जुळावा आणि एकमेकांशी मैत्री जपता यावी म्हणून राजा नेर्लेकर आणि आम्ही काही जणांनी मिळून हा ग्रुप सुरू केला. प्रत्येकासाठी ही मैत्री
खास आहे.'
90 वर्षांचे कृष्णा चांदेरे हेही काही वर्षांपासून ग्रुपमध्ये येत आहेत. ते म्हणतात, या ग्रुपने आम्हा सर्वांना इतक्या वर्षांनंतरही मैत्री जपण्याचे निमित्त दिले आहे. सुख-दु:ख वाटण्यासाठी, प्रत्येकाला मन मोकळे करण्यासाठी मित्र-मैत्रिणी मिळाल्या आहेत. कट्ट्यावर आल्यावर प्रत्येकाचे हसरे चेहरे दिसल्यावर आणि त्यांना भेटल्यावर खूप आनंद होतो. इतक्या वर्षांची मैत्री या कट्ट्यामुळे टिकून आहे.
आजी-आजोबांशी जुळले मैत्रीचे बंध…
फेसबुक, टि्वटर आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर फ्रेंड्स बनविण्यापेक्षा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना मित्र बनवून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संकल्प 'फ्रेंड्शिप डे'च्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी केला. आजी-आजोबांना फ्रेंड्शिप बँड बांधत विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी अनोखा मैत्रीचा बंध जोडला. आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवायोजनेच्या विद्यार्थ्यांनी हे अनोखे निमित्त शोधले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आजी-आजोबांसोबत विद्यार्थ्यांनी फ्रेंड्शिप डे साजरा केला. राष्ट्रीय सेवायोजनेच्या कॅप्टन अनुष्का परदेशी आणि राज घाडगे, त्याचबरोबर तनिष्का खन्ना, रोशनी झा, राहुल घोडके हेही उपक्रमात सहभागी झाले. अभिनवचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी संयोजन केले.