पुणे

पुणे : बेलवाडी बलात्कारप्रकरणी आणखी दोघे अटकेत

अमृता चौगुले

वालचंदनगर, पुढारी वृत्तसेवा : बेलवाडी (ता. इंदापूर) येथे एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या मुख्य आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, त्याला मदत करणार्‍या दोन साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शनिवारी (दि. 20) हा घृणास्पद प्रकार घडला असून, पीडितेच्या आईने वालचंदनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ या घटनेतील मुख्य आरोपी राहुल हनुमंत जाधव (रा. बेलवाडी, ता. इंदापूर) यास अटक केली होती. त्यास सोमवारी (दि. 22) इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. 26 पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटनेचा तपास करताना पीडित मुलीचा जबाब घेतला असता तिच्यावर मुख्य आरोपी राहुल जाधव याने बलात्कार केला असून, उर्वरित दोघांनी त्याला मदत केल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी जाधव यास मदत केलेल्या तुकाराम लक्ष्मण गोरे (रा. बेलवाडी) व आप्पा निवृत्ती गायकवाड (रा. सणसर) या दोघांना सोमवारी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींवर भा. दं. वि. 376 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.

या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. घटनेच्या अनुषंगाने अचूक तपास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून आम्ही प्रबोधन करणार आहोत. नागरिकांनी या घटनेतील पीडित मुलीबाबत नाव, पत्ता ,फोटो अथवा तिच्या कुटुंबाची माहिती प्रसारित करू नये; अन्यथा त्यांच्यावर बाललैंगिक कायद्यातील कलम 23 नुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

                                                       – गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT