पुणे

पुणे : बारे खुर्द स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याचा निधी माघारी

अमृता चौगुले

भोर, पुढारी वृत्तसेवा : बारे खुर्द (ता. भोर) येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी धरणग्रस्त प्रकल्प योजनेतून सुमारे 13 लाख रुपये निधी मंजूर केला होता. परंतु, रस्त्यासाठी शेतकर्‍यांनी हरकती दिल्यामुळे तो निधी परत गेला आहे. नागरिकांना अंत्यविधीप्रसंगी जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूर्वीपासून शेतकर्‍यांच्या मालकी जागेतून स्मशानभूमीपर्यंत आठ फूट रस्ता रुंद असून, या कामासाठी शासनाने 13 लाख रुपये निधी मंजूर केला होता. मात्र, रस्ता अरुंद असल्यामुळे काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच जागा मालकांनी हरकत दिल्यामुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. परिणामी, मंजूर झालेला निधी परत गेला आहे. अंत्यविधीप्रसंगी पंचक्रोशीतील नागरिकांना पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून मार्ग काढून कसरत करावी लागते. संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप रस्त्याचे काम झाले नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

शासनाकडून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु, त्याला हरकत आल्यामुळे तो परत गेला आहे. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येऊन मार्ग काढावा. गावच्या विकासकामात हरकत देऊ नये.

                                                      – महेश खुटवड, सरपंच, बारे खुर्द

SCROLL FOR NEXT