नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाची अधिकृत परवानगी न घेता सुरू केलेले नसरापूर रस्त्यावरील वडाच्या झाडांच्या छाटणीचे काम वन विभागाने थांबविले. परवानगीविना झाडांची छाटणी रखडल्याने धोकादायक फांद्या कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी वन विभागाकडून अधिकृत परवानगी न घेता चेलाडी फाटा ते नसरापूर येथील धोकादायक झाडांच्या फांद्या, जीर्ण झाडे काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. हे काम ठेकादाराला देण्यात आले आहे. पयार्वरणप्रेमींनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर वन विभागाची परवानगी नसल्याची बाब उघडकीस आली.
चेलाडी फाटा ते वेल्हा-महाड या राज्यमार्गावरील झाडांच्या जीर्ण, धोकादायक फांद्या काढणेबाबत पत्र संबंधित ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत्यांनी दि. 1 जूनला दिले होते. त्यानुसार ठेकेदाराने दि. 11 रोजी येथील एका धोकादायक वडाची व जीर्ण झाडाची छाटणी केली. परवानगीबाबत वन्यप्रेमींनी हरकत घेतल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबविले. बांधकाम विभागाने परवानगी घेतली नसल्याचे ठेकेदाराला सांगण्यात आले. परवानगी मिळत नाही तोपर्यंत काम करणार नसल्याचे ठेकेदार भाऊ दसवडकर यांनी सांगितले. याबाबत उपअभियंता संजय संकपाळ यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
बांधकाम विभागाचे अधिकारी पी. जी. गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झाडांच्या छाटणीचे काम ठेकेदाराला दिले असल्याचे सांगत परवानगीसाठी वन विभागाकडे अर्ज दिल्याचे सांगितले. मात्र, गाडे यांनी कोणताही अर्ज अथवा परवानगी मागितली नसल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
झाडांच्या छाटणीचे काम 31 मेपूर्वी परवानगी घेऊन करणे गरजेचे होते. मात्र, बांधकाम विभागाने परवानगी न घेता छाटणी केली आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– डी. एस. तांबे, वनरक्षक नसरापूर, वन विभाग